
मनमाड -(प्रतिनिधी)— मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षिका एकता बोदडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी आपल्या मनोगतातून यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्यसैनिक असलेले चव्हाण हे एक दूरदृष्टीचे नेते होते, ज्यांनी शिक्षण, सहकार, कृषी आणि औद्योगिक विकासाचा पाया घातला. त्यांनी भारताचे संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान यांसारखी पदेही भूषवली आहेत. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे झाला.

त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि १९३२ मध्ये त्यांना कारावास झाला.मुंबई राज्याच्या विभाजनानंतर महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टीचे निर्णय घेतले.केंद्रीय राजकारणात त्यांनी अर्थमंत्री, संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले. ते एक स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, अभ्यासक, साहित्यिक आणि व्याख्याते होते. त्यांनी ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्रही लिहिले आहे. त्यांनी सहकार आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना दिली.

याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
