
सिन्नर (प्रतिनिधी ) विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान पश्चिम महाराष्ट्र प्रांत तथा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संघ शताब्दी निमित्ताने सप्तशक्ती संगम मेळावा विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या समाजसेविका गीताताई कुलकर्णी व निर्मला गोपाळ कुलकुर्णी सरदवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जेजुरकर,कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रा क्षत्रिय उपस्थित होत्या.
प्रमुख व्याख्यात्या गीताताई कुलकर्णी यांनी आपल्या ‘भारतीय विकासात महिलांची भुमिका’ या विषयावर व्याख्यान देतांना कुटुंबातील संवाद,मुलांवरील संस्कार,महिलांची कुटुंब घडवण्यातील भूमिका प्रभावीपणे विशद केली.राष्ट्रनिर्मिती व पर्यावरणासंबंधी जागरूक राहून पर्यावरण संवर्धन कसे करावे यांसारखे मुद्दे आपल्या व्याख्यानातून सुरेखा जेजूरकर यांनी प्रभावीपणे पटवून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले यांनी केले.कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर त्यांनी प्रकाश टाकला.प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेच्या पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी करून दिला.शाळेतील शिक्षिका सुप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील गीतमंचाने वातावरण निर्मिती हम ही मातृशक्ती है या सुमधुर गीताने केली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वती वंदना म्हणून मेळाव्याचा प्रारंभ झाला.यावेळी शिक्षिका तृषाली बोडके यांनी भारतीय संस्कृतीवर आधारित प्रश्न विचारले व उत्तरे देणाऱ्या मातांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षिका उमा लोकरे यांच्या मार्गदर्शनाने विविध वयोगटातील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा करून त्यांचे स्वगत सादर करून महिलांना महत्त्वपूर्ण असा संदेश दिला व उपस्थितांची मने जिंकली.कला,क्रीडा व साहित्य क्षेत्रात आपल्या पाल्यांना घडवणाऱ्या मातांचा विद्याभारती तर्फे सन्मान करण्यात आला.सूत्रसंचालन निलिमा दुसाने यांनी केले. संकल्प प्रतिज्ञेने कार्यक्रमाची सांगता झाली.
