
नाशिक:-( प्रतिनिधी )वेदना आणि प्रतिभा यांचा जेव्हा संगम होतो; तेव्हाच उत्तम साहित्य जन्माला येत असते. असं साहित्य निर्माण करत समाजाला जगण्याची दिशा देणारे लेखक-कवी हे संवेदनांचं झाड असतात, असे प्रतिपादन अ.भा.साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शंभर सारस्वतांचा सन्मान आणि पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमाच्या द्विशतक सोहळ्यात पुस्तक प्रकाशनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाध्यक्ष प्रा.दिलीप फडके, प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य हरीष आडके, नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा, प्रतिष्ठानच्या आधारवड अनुसया पवार, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी वटवृक्ष पूजन करण्यात आले. ॲड.भगीरथ शिंदे यांच्या हस्ते ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमातील सहभागी साहित्यिकांच्या संक्षिप्त दस्तऐवजाचे प्रकाशन झाले. माणूस हा जगण्याचा केंद्रबिंदू असून माणूसपणाचा वसा आणि वारसा घेतल्याशिवाय माणूसपण जपता येत नाही, असे उदबोधक विचार प्रकाश दायमा यांनी मांडले. नाशिक जिल्ह्याच्या सांस्कृतिक-साहित्यिक व्यवहारात गिरणा गौरव प्रतिष्ठानने एक वेगळी प्रतिमा तयार केल्याचे प्राचार्य हरीश आडके यांनी सांगितले. तर साहित्यातून उमटलेले माणसाचे प्रतिबिंब समाजाला दिशा देत असल्याचे ॲड.भगीरथ शिंदे यांनी म्हटले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.दिलीप फडके यांनी साहित्य हा समाजाचा आरसा असल्याने समाजासाठी आपण दिलेल्या योगदानाचे प्रतिबिंब दिसत असते, असे गौरवोदगार काढले.
‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमामध्ये विशेष उपस्थित राहणारे अजित कुलकर्णी आणि मुक्ता चिंधडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर कार्यक्रमाच्या प्रारंभी संपन्न झालेल्या कविसंमेलनात राजेश जाधव, ॲड.अभिलाषा दायमा, शुभांगी पाटील, अलका कुलकर्णी, गोरख पालवे या कवींनी सहभाग घेतला. बाळासाहेब गिरी यांनी सूत्रसंचालन केले.
‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या २०० साहित्यिकांमधील १०० साहित्यिकांचा समावेश असलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात सहभागी झालेल्या माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन, ज्येष्ठ समीक्षक डॉ.एकनाथ पगार, पुंजाजी मालुंजकर, प्र.द.कुलकर्णी, डॉ.सीताराम कोल्हे, ॲड.मिलिंद चिंधडे, सावळीराम तिदमे, विजयकुमार मिठे, देवचंद महाले, डॉ.एस.के.पाटील यांच्यासह १०० साहित्यिकांचा कवी किरण भावसार यांनी साकारलेले छायाचित्र देऊन सन्मान करण्यात आला. साहित्यिक यादीवाचन संजय आहेर यांनी केले. शीतल कुयटे यांनी प्रास्ताविक केले. सीमा बाजी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत कापसे यांनी आभार मानले. राजेंद्र उगले यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या २६व्या वर्धापन दिनी सन्मानित साहित्यिकांसह प्रमुख पाहुणे

