नाशिक:- ( प्रतिनिधी )अतिशय मौल्यवान असलेल्या मानवी जीवनाचं श्रेष्ठत्व माणसाला कळत नाही. संतांसह महापुरुषांनी आपल्या वागण्यातून आणि विचारांतून दिलेल्या संदेशातून हे माणुसकीचे नाते जपण्याची आज नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते प्रा.केशव मोरे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात १९९वे पुष्प 'गानमेवा' या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲड.मिलिंद चिंधडे होते.
प्रा.मोरे पुढे म्हणाले की, आपल्या मनासारखं घडावं म्हणून प्रत्येक माणूस धडपड करत असतो. समाजातील विदारक आणि ज्वलंत प्रश्नांना स्पर्श केल्याशिवाय कोणतेही स्वप्न साकार होत नाही. त्यासाठी समाज आणि माणसाविषयी कृतार्थ भावना प्रत्येकात असावी. याची जाणीव ठेवल्याशिवाय आयुष्याचा गानमेवा पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी पुस्तकातील देवा तूच माझा आधार, ओम प्रभू गणराया, तुझ्या चिभेला चटका, उठा गड्यांनो, भारतवीरा उठ जरा, गरिबासाठी केली सेवा अशी गाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
दत्तात्रय दाणी आणि तुकाराम ढिकले या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. मधुकर गिरी यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (१८) या उपक्रमाचे २००वे पुष्प सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके हे 'पुस्तकानुभव' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.