
जळगाव निंबायती (वार्ताहर) – ग्रामीण भागातील मुलींनी घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून शालेय अभ्यासाबरोबरच आपल्या आवडत्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवायला हवे, याकामी जीवनात यशस्वी होण्यासाठी संयम, जिद्द, चिकाटी व सातत्य ही चतु:सूत्री अंगीकारावी असे प्रतिपादन भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधार रेश्मा पुणेकर यांनी केले. त्या येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील होते.
गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या भव्य सत्कार सोहळ्यास पुणेकर यांचे पती शिवव्याख्याते प्रा. डॉ. संतोष तांबे, मल्हार सेनेचे पदाधिकारी मच्छिंद्र बिडगर, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, संस्थेचे समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

चीन या देशातून खेळून मायदेशी परतलेल्या पुणेकर शिर्डी विमानतळावर उतरल्या. त्यानंतर त्या दिवाळसणासाठी मच्छिंद्र बिडकर (कानडगाव) यांच्याकडे आल्या असता त्यांचा जळगाव निंबायती येथे सत्कार करण्यात आला. बारामतीच्या रेशमाने अत्यंत संघर्षाने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याचबरोबर तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले असून, २८ राज्यस्तरीय सामने खेळले आहेत. रेश्माने आतापर्यंत सर्व स्तरांवरील बेसबॉल स्पर्धांमध्ये चार सुवर्ण, सहा रौप्य व तीन कांस्य पदके पटकावली आहेत. तिला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवछत्रपती हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. शासनाच्या धोरणानुसार पुणे महापालिकेमध्ये सहाय्यक क्रीडा आयुक्त या पदावर नियुक्ती मिळाली आहे. पुणेकर यांचे पती डॉ. संतोष तांबे यांनी आपल्या मनोगतातून रेशमाची संघर्षमय जीवनगाथा उलगडून सांगितली. सूत्रसंचालन ए. एम. साळुंके यांनी केले तर आभार पी. एम. थोरे यांनी मानलेत.
