
नाशिक:- आदिवासी भागातील समाज आणि शिक्षण व्यवस्थेचे रूप उलगडताना जीवनाचा वास्तव इतिहास मांडता आला पाहिजे. असे प्रतिपादन वामन राऊत यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘चिराखाणी’ या साहित्यकृतीवर हुतात्मा स्मारकात संवाद साधताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजित कुलकर्णी होते. वामन राऊत पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील सण व परंपरा, पारंपरिक शेती व रानमेवा, शाळा, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालय शिक्षण,प्रशासकीय जबाबदारी अशा जबाबदाऱ्या पूर्ण करताना, जंगलाचे अनंत उपकार आहेत. म्हणून जल जमीन जंगलच देव होतो.गावाशेजारी मोठा खडक आहे त्या खडका वरून चिराखाणी हे नाव या आत्मकथनाला दिले असून, वास्तव अनुभव आणि स्व जाणीव व आदिम समूह याचे स्पष्ट चित्रण या पुस्तकात नमूद केले असून, ग्रामीण भागात वास्तव्य असल्यामुळे ऐतिहासिक व गावच्या पर्यावरण दृष्टीने असलेल्या चिराखाणी हे आत्मचरित्र विविध पातळीवर तसेच ग्रामीण भागातील जीवनशैली यांची जाणीव करून देते. लांबी, ढोब, टोपा, सागळ, बाळदी, मळा, तिकटा,वायफळ, बारस, मोड, चिपाट, तणस, पेरणा, खटखुबा, मादळवळे, चूड, धुळवड, भाग, आखोजा, नडवली, पाचवी,राब, शाखा, वाघ,तिकटा,मिरी, रासकवर, उथळ, देवभात, चिराखाणी सारजा, बंदर, कूलिंग, कव्हर,घोंगडी, वाली, गोरा,कांडी, कापणे, बरकल, भरडा, अशा अनेक बोली भाषेतील शब्दांचा वापर या आत्मचरित्रामध्ये आत्मकथन केले असून, अनेक चांगल्या वाईट, श्रेष्ठ, दृष्ट, बेरक्या तसेच जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे मूल्य जोपासताना विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा या आत्मचरित्रात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील पोषक व साळशी वातावरण निर्मिती आत्मकथेला वेगळे महत्व प्राप्त करून देते. खेड्यातील कष्टमय जीवन जगत प्रचंड संघर्ष करून अधिकारी पदापर्यंत झेप घेणारी माणसं जेव्हा वास्तव निर्भीडपणे मांडतात तेव्हा त्या साहित्यकृतीला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. यावेळी सुनंदा पाटील, अर्जुन वेलजाळी या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सावळीराम तिदमे यांनी आभार मानले, तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी रविकांत शार्दुल हे “गवसले आकाश नवे” या साहित्यकृतीवर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
