

नाशिक:(प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गौरव करत आहे, हा पुरस्कार सर्वांसाठी उर्जा देणारा आहे, असे गौरवोद्गार साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे यांनी काढले. ते कराड नगरीतील वेणूताई चव्हाण स्मृती सदन येथे डाकेवाडीच्या प्रतिष्ठित स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. निलेश खरे बोलताना पुढे म्हणाले कि, डॉ. संदीप डाकवे हे बहुप्रतीभावंत व्यक्तिमत्व असून त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून समाजासाठी वेगळी वाट निर्माण केली आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते.यावेळी व्यासपीठावर प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर, महंत अहिल्यागिरिजी महाराज, सुप्रसिध्द गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, टीव्ही 9 मराठीच्या वृत्तनिवेदिका/ पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, रयत विद्यार्थी विचार मंच (पुणे) संस्थापक/अध्यक्ष ॲड.धम्मराज साळवे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका सायली धनाबाई, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव, ट्रस्टचे संस्थापक डॉ. संदीप डाकवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नाशिक येथील गीतकार/ कवी सोमनाथ पगार यांच्या ‘कारण्यबोध’ (वैश्विक महामारी कोरोना काळातील भयावह परिस्थितीचा साहित्यिक दस्ताऐवज) या कवितासंग्रहाला डाकेवाडी येथील या प्रतिष्ठित स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार’ साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे, प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर, महंत अहिल्यागिरिजी महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. त्यांच्या काव्य लेखणाची दखल घेवून त्यांचा हा सन्मान करण्यात आला.आनंदाची बाब म्हणजे प्रधानमंत्री चित्रपटात गीतकार सोमनाथ पगार यांनी लिहलेल्या गीताला ज्यांचा स्वरसाज लाभला आहे, असे सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. हे विशेष.सोमनाथ पगार हे उदयोन्मुख गीतकार, कवी, लेखक, ट्रान्सलेटर, युट्युबर, ब्लॉगर तसेच विविध साहित्यिक कलाकृतींच्या पुस्तक परिचय तसेच परीक्षण लिहण्यासाठी साहित्य क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचे असून नाशिक येथील निगळ फिल्म्स प्रोडक्शन निर्मित ‘प्रधानमंत्री’ या चित्रपटाचे ते गीतकार तसेच ‘श्री. संत नारायणनंद काठे महाराज महिमा’ ही मराठी भक्ती गीते तर ‘ऐका हो ऐका माझ्या बळीराज्याची कथा’ ही मराठी शेतकरी गीते यासाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.पुरस्कार हा केवळ एक सन्मान नसून, सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा तसेच पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा मोठा आधार आहे. या पुरस्कारामुळे माझ्या कार्याला एक नवीन ओळख मिळाली आहे, जी यापुढे अधिक उत्साहाने लिखाणास करण्यासाठी बळ देईल. असे यावेळी सोमनाथ पगार यांनी सांगितले.या पुरस्काराबद्दल त्यांचे साहित्यिक, कला, मनोरंजन, सामाजिक, राजकीय इत्यादी सर्वच स्तरांतून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप डाकवे, सूत्रसंचालन सौ. अंजली गोडसे, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी मानले. दीपप्रज्वलन व कु. माधुरी करपे हिच्या कथ्थकच्या नृत्यातील गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, सत्यवान मंडलिक, समाधान पाटील, जालिंदर येळवे, (फौजी), चंद्रकांत चव्हाण, बशराज चल्लान, गुलाब जाधव, (फौजी), भीमराव धुळप, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, पूनम वाचन, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
