
आदिवासी मी बालिका
बघा माझीही दिवाळी
पानं फुलांनी सजली
माझ्या अंगणी रांगोळी..!
जगाहुनी हा वेगळा
पैश्यांविना माझा सण
हेवा वाटावा जगाला
असे माझे कलागुण..!
दोन दिसांचा तुमचा
तेलकट तो फराळ
बारा महिने चाखते
रानमेवा मी रसाळ..!
दारी निर्जीव दिव्यांची
फक्त तुमची आरास
माझ्या झोपडीच्या माथी
चंद्र-चांदण्यांची रास..!
घरी तुमच्या तेवढा
अगरबत्तीचा गंधमाझ्या
फाटक्या झापात भिन्न
फुलांचा सुगंध..!
दारिद्रयात असूनही
सदा राहते आनंदी
लेक मी या सह्याद्रीची
माझे जीवन स्वच्छंदी..!
वस्त्रे जुनेचं लेवूनी
मुद्रा ठेवते हसरी
सांगा दिसते मी कशी
रानातली रानपरी..!
✍🏼प्राचार्य देवदत्त बोरसे✍🏼
(सुगंधानुज)नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.मो.नं.९४२१५०१६९५.
