
नाशिक:(प्रतिनिधी)- सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या जमान्यात प्रत्येकाला आरोग्याच्या समस्या उदभवल्या आहेत. आजच्या पिढीला यातून बाहेर काढून निकोप आणि आदर्श संस्कारित पिढी निर्माण झाली पाहिजे. अशा परिस्थितीत सुदृढ समाज निर्मितीत क्रीडाशिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते, असे प्रतिपादन दिंडोरीचे खा.भास्कर भगरे यांनी केले. कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात भाऊसाहेबनगर येथील क.का.वाघ विद्याभवनचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व रघुनाथ रामभाऊ चव्हाण यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, अमळनेरचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू बोरस्ते, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, माजी नगरसेवक ॲड.तानाजी जायभावे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मोहन शेलार, शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, महाराष्ट्र राज्य कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी कारवाळ, पुणे येथील गिरमे शिक्षण संस्थेचे सचिव विजय भुजबळ, माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर, जयपूरच्या कुमावत महासभेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मुंडावरे, कुमावत समाज विकास संस्थेचे सहसचिव पंडित कुमावत, नाशिक जिल्हा कुमावत समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोक भवरे, कवी विवेक उगलमुगले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. खा.भगरे पुढे म्हणाले की, खेळाडूंमध्ये शिस्त, सातत्य, नेतृत्वगुण, सहजीवन, बंधुत्व निर्माण होण्यासाठी मुले मैदानावर खेळायला हवी. भाऊसाहेब नगरच्या शाळेने अनेक क्रीडापटू निर्माण करून देशभरात आपला दबदबा निर्माण केला. या शाळेच्या सर्वांगीण उत्कर्षात शाळा व्यवस्थापन, शिक्षक कर्मचाऱ्यांबरोबरच क्रीडामहर्षी चव्हाण सर यांचा मोलाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी श्री.चव्हाण सर यांच्या क्रीडाविषयक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणाऱ्या संपादक प्राचार्य रवींद्र मोरे, सुरेश सादडे, शिवछत्रपती क्रीडासंघटक अशोक दुधारे, अर्जुन वेलजाळी संपादित ‘क्रीडामहर्षी’ या गौरवग्रंथासह कवी रघुनाथ चव्हाण यांच्या अक्षरबंध प्रकाशन प्रकाशित ‘पाऊलवाट’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या संजय होळकर, राजू शिंदे, स्नेहल विधाते, ज्ञानेश्वर निगळ, सुनील मोरे या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. मान्यवरांसह श्री.चव्हाण यांच्या परिवारातील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त त्यांच्या कार्याचा गौरव केला. सत्कारमूर्ती रघुनाथ चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी मीराबाई चव्हाण यांनी आजपर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकत कृतार्थतेची भावना व्यक्त केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कुमावत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्त लोकोपायलट प्रवीण कुमावत, बॉश कंपनीतील कार्यरत अतुल कुमावत, पुणे जि.प.च्या उपशिक्षणाधिकारी प्रणिता नाईक यांसह कुमावत-चव्हाण परिवाराने कार्यक्रमाचे संयोजन केले. गायिका विजया मणेरीकर-वैरागकर यांनी स्वागतगीत, प्राचार्य रवींद्र मोरे यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन वेलजाळी यांनी आभार तर रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले. पं.शंकरराव वैरागकर यांनी सादर केलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
