
ओझर: दि.२० वार्ताहर दिवाळीच्या पूर्वसंध्येला सह्याद्री पर्वत रांगेतील किल्ले रामशेज दिव्यांनी व मशालींनी उजळून निघाला. नाशिक मधील छत्रपती शिवशंभोंच्या पराक्रमाची साक्ष असलेला दिंडोरी तालुक्यातील गुजरात व डांग प्रांतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा अभेद्य असा किल्ला रामशेज वरती दिवाळीच्या पूर्वसंध्येला शिवमुद्रा प्रतिष्ठान सह्याद्री दुर्गसेवक व सकल मराठा समाजाच्या वतीने दीपोत्सव व मशाल उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शेकडो दिव्यांनी व मशाल यांनी संपूर्ण गड उजळून निघाला. प्रथम ध्वजाचे पूजन करून नवीन ध्वजारोहण करण्यात आले. शिवछत्रपतींच्या स्मारकाभोवती फुलांची व रांगोळीचे आरास केली. आणि शिवछत्रपतींना हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. संपूर्ण गडाच्या तटबंदीला दिव्यांची व मशालीची आरास केली होती. रांगोळीने ठिकठिकाणी परिसर सुशोभित करण्यात आला होता. काही साहसी लाठीकाठी लेझीम तलवारबाजी खेळ घेण्यात आले. रिंगण घेऊन शिवशंभूंचा जयजयकार करण्यात आला. यासाठी दुपारनंतर मावळे रामशेज किल्ल्यावरती दाखल झाले. प्रथम रामशेज गावातील विठोबा रखुमाई व हनुमान मंदिरात शिवछत्रपतींच्या पालखीचे पूजन करण्यात आले.

व पालखी सजवून शिवछत्रपतींना त्यात स्थापित करून गडावर मुख्य स्मारकासमोर पूजन करण्यात आले. तर ते शेवटी गडाला आगीपासून धोका होऊ नये म्हणून पायथ्याला येऊन फटाक्यांची आतषबाजी करून सर्व शिवप्रेमींनी आनंद उत्सव साजरा केला. यामध्ये लहान मुलांपासून तर वयोवृद्ध सह बहुसंख्य मुली महिला व शिवप्रेमी आनंदाने सहभागी झाले होते.
