
नांदगाव (प्रतिनिधी ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई यांच्यावतीने मागील महिन्यात नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने विविध गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकरी वर्गासह नागरिकांचे नुकसान झाले यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही पुरात वाहून गेल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सदर शैक्षणिक मदत साहित्य वितरण सोहळा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे-पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन त्यांनी मुंबईच्या तोलाणी महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून नांदगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केलेल्या शैक्षणिक मदत साहित्य वाटप उपक्रमाची स्तुती केली

करून तोलानी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळ व व महाविद्यालय कर्मचारीवृंद यांनी दिलेल्या मदतीबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केला. नांदगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन भविष्यात आपणही समाजातील गरजू लोकांना संकटाच्या काळात मदत करण्याची क्षमता विकसित करण्याचे याप्रसंगी आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी आपल्या मनोगतातून

तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मदत करून जो आदर्श प्रस्थापित करून दिला त्यातून उतराई होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुसंस्कारांची जोपासना करून समाजोपयोगी कार्यांमध्ये सहभागी होण्याच्या आवाहन केले. शैक्षणिक मदत साहित्य वितरण सोहळ्यासाठी तोलाणी कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. इश्तियाक चिपळूणकर, डॉ.कौस्तुभ भगत व प्रशासकीय मदतनीस हर्षल उपस्थित होते. डॉक्टर चिपळूणकर यांनी आपल्या मनोगतातुन शहरी भागातील काही विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अनास्था आढळत असल्याचे निदर्शनास आणून दिले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी परिश्रमपूर्वक उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करत असल्याचे सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या शिक्षणकार्यात अडथळा येऊ नये यासाठी आमच्या महाविद्यालयाने दिलेली ही छोटीशी मदत ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एक खारीचा वाटा घेण्याचा आमच्या तोलाणी महाविद्यालयाचा मानस असल्याने ही मदत केल्याचे सुतोवाच केले.

वरिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व संस्थेचे सभासद विश्वासराव कवडे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी मंचावर वरिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉक्टर प्रवीण निकम, प्रतिष्ठित नागरिक रमेश आण्णा बोरसे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, डॉ.खंदारे सर व महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्राध्यापक आटोळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे प्रा जी.व्ही.बोरसे व प्रा.बी. के.पवार यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा.सी.बी.निगळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
