
ईगतपुरी( तालुका प्रतिनिधी- नवनाथ पाटिल यांचेकडुन-) आज जागतिक जवळीकतेच्या पाश्वर्भुमी वर व आधुनीक तंत्रज्ञानांचे कचाटयात माणुस अंतर्बाहय बदलतो आहे. त्याची वैचारीक घसरण वाढीला लागलेली आहे.सामाजिक अध;पतन वेगाने सुरु आहे. चळवळी मोडित निघत आहे आणि दुर्दैवाने झापडबंद होऊन समाजाची उदासीनता वाढते आहे.हे सगळं घोर चिंतेचं कारण आहे. सुदृढ समाज निर्मितीसाठी समाजाने चळवळीनां पाठबळ दिले पाहिजे असे आवाहन सुप्रसिद्ध लेखक,विचारवंत नवनाथ अर्जुन पाटिल गायकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक यांचे वतीने आयोजीत “पुस्तकावर बोलु काही….” या उपक्रमातंर्गत आपल्या आघाडी या लघु कथा संग्रहाचे अनुषंगाने गायकर पाटिल हे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कवी तुकाराम ढिकले हे होते, तर याप्रसंगी माजी आमदार तथा लेखक नानासाहेब बोरस्ते, स्वाध्यायी विचारवंत सावळीराम तिदमे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष माणिकराव गोडसे, लेखक मिलिंद चिंधडे, जेष्ठ लेखिका अलकाताई दराडे, जयश्री राणे, सुनंदा पाटिल, शुभांगी पाटिल, नंदकुमार दुसानीस व कार्यक्रमाचे आयोजक सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या आघाडी या पुस्तकातील मानवी भाव भावनाचां कल्लोळ असणार्या कथा गायकर यांनी ग्रामीण व विनोदी शैलीत खुसखुशीत भाष्य करत उलगडुन दाखवल्या. वैचारीक तोंडे दोन दिशेला असतानांही निर्लज्जपणे सत्तेसाठी सोयरीक करणार्या पक्षानां नागडे करणार्या आघाडी या शिर्षक कथेतुन यामुळे सामान्य व निष्ठावान कार्यकर्त्याचां होणारा भ्रमनिरास, कोंडी व घुसमट त्यांनी उलगडुन दाखवली. जात या कथेतुन मराठा आरक्षणावर भाष्य करत मराठयाचें खालावलेले चित्र त्यांनी उभे केले. माणसाची किंमत या कथेतुन माणसं जोडणं किती गरजेचं आहे हे अधोरेखित केले तर जिमीन या कथेतुन भोगवादी संस्कृतीवर त्यांनी प्रहार केला. बारावा मजला या कथेतुन वाढते शहरीकरण व घुसमट व्यक्त केली तर आडनाव या कथेतुन विचित्र वाटणार्या आडनावाची रंजक उत्पत्तीची गोष्ट त्यांनी सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले तर आभार कवियत्री सुनंदा पाटिल यांनी मानले.——————————-*पवाराचीं धडपड, नाशिककराचीं उदासिनता* गिरणा गौरव प्रतिष्ठानचे माध्यमातुन सुरेश पवार या अवलिया माणसाने आजतागायत दोनशे साहित्यिकानां व्यासपिठ देण्याचा विक्रम केला आहे.याशिवाय विविध नामवंत सोहळा, दिवाळी अंक असे कितीतरी उपक्रम ते सातत्याने राबवत आहे. दुर्देवाने नाशिक शहरासारख्या सुजाण शहरात मात्र या व अशा अनेक उपक्रमाकडे पाठ फिरवली जाते आहे.अशा उपक्रमाबाबत नाशिककराचीं उदासीनता खेदजनक आहे. भरकटलेल्याचं जाऊ दया, किमान वैचारीक चळवळीशी जोडलेल्या साहित्यिक व साहित्य प्रेमींचांही अशा उपक्रमाकडे होणारा कानाडोळा हे दुर्दैवी आहे अशी खंत या निमित्ताने व्यक्त करणेत आली.
