
नाशिक ( प्रतिनिधी). “नाशिक मध्ये तुम्ही भाषा संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन करणार आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे नाशिकच्या विकासात भर पडेल याची खात्री आहे. चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच आमचा पाठिंबा असतो. त्यामुळे तुम्ही उत्तम साहित्य संकुल उभारून, मराठी भाषेचे संवर्धन करावे” असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडला शासकीय भूखंड वाटप करण्याचा शासन निर्णय घेतल्याबद्दल शाखेने त्यांचे ऋणनिर्देश केले. श्रीम. सुरेखा गणोरे, श्रीम. रेखा पाटील व श्रीम. वृंदा देशमुख यांनी मायेची शाल, ग्रंथभेट आणि एक विशेष स्मृतिचिन्ह देवून भुजबळांचा सत्कार केला. यावेळी कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, दशरथ लोखंडे, शिवाजी म्हस्के, हर्षल भामरे, माजी नगरसेवक प्रा. शरद मोरे, पांडुरंग चव्हाण आणि रामचंद्र शिंदे उपस्थित होते.
