
नाशिक: (प्रतिनिधी )- दरवर्षी आषाढी-कार्तिकीच्या वारीला वारकरी नित्यनेमाने जात असतो. तेथे त्याला पंढरीचा प्राणसखा विठ्ठलाचे दर्शन घडते. त्याचप्रमाणे आम्हां कवी आणि साहित्यिकांचे विठ्ठलरूपी गुरू कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नाशिकचे! त्यांच्या दर्शनाने मी भाग्यवंत झालो. म्हणूनच नाशिक हे काळजात जपलेलं माझं काव्यमाहेर आहे, असे भावोदगार ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रा.अशोक बागवे यांनी काढले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित कविता,आठवणी,किस्से आणि दिलखुलास… ‘आजतागायत बागवे…’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ कवी प्रा.बागवे बोलत होते. त्यांच्याशी सुप्रसिद्ध रंगकर्मी सुधीर चित्ते यांनी संवाद साधला. प्रारंभीच प्रा.बागवे यांनी हुतात्मा स्मारकासारख्या पवित्र मंदिरात मुलाखत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या दिलखुलास संवादात त्यांनी सांगितले की, कुसुमाग्रज या आमच्या आद्य दैवताची भेट गुरुवर्य मंगेश पाडगावकर यांनी घडवून आणली. कुसुमाग्रज जेव्हा बोलायचे; तेव्हा जणूकाही ज्ञानाचा अनोखा पूर यायचा. संपन्न आशयाची कविता लिहिणाऱ्या कवीला कुठे थांबायचं; हे कळलं पाहिजे. विविधांगी कवितांसह चित्रपट-मालिका यांच्यासाठी गाणी लिहिताना खूपच अनुभव आले. आपली गरिबी कळणे हीच आपली श्रीमंती असते. त्यातून जगण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. कवीनं नेहमी वेगळा विचार मांडला पाहिजे. कारण जगण्यातील सलच अस्सल कवितेला जन्म देत असते, असे सांगून त्यांनी- *माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल* *ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल…*या कवितेसह विविध कविता सादर करत रसिकांना अनोखा काव्यानंद दिला. प्रा.बागवे यांच्या आजपर्यंतच्या साहित्यिक वाटचालीबद्दल कवी अरुण गवळी शब्दांकित मानपत्र संयोजकांच्या वतीने प्रदान करण्यात आले. ‘पुस्तकावर बोलू काही’चे समन्वयक संजय आहेर यांनी मानपत्र वाचन केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सदस्य कवी अरुण गवळी, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर आणि मधुकर गिरी यांनी स्वागत केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी आभार मानले. नाशिककर साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
