
सिन्नर (वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी)नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात सोमवारी (दि. 6) दुपारी भीषण प्रकार घडला. सिन्नरकडे गाद्यांची डिलिव्हरी घेऊन येत असलेला छोटा हत्ती टेम्पो अचानक पेट घेतल्याने परिसरात काही काळ गोंधळ उडाला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवत जीव वाचवला.विहीतगाव येथील जाकीर गनी पिंजारी यांच्या गादी बनविण्याच्या कारखान्यातील सुमारे 47 गाद्या घेऊन ते स्वतः टेम्पो क्र. MH 02 AR 6963 मधून सिन्नरकडे निघाले होते. दुपारी सुमारास मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ पोहोचताच चालक सीटखालून धूर येऊ लागल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ टेम्पो रस्त्याच्या कडेला घेताच काही क्षणांतच आगीचा भडका उडाला.चालकाने सोबत असलेल्या पाण्याच्या ड्रममधील पाणी शिंपडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता वाढतच गेली. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनीही थांबून मदत केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे 12 ते 15 गाद्या बाहेर काढण्यात यश आले, परंतु उर्वरित गाद्या आणि टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाले.या घटनेत अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि चालकाच्या सूजबूजेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
