
नासाका विद्यालयात ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानातून प्राप्त गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक अरुण पगार आणि शिक्षक-कर्मचारीवृंद.
नाशिकरोड ( प्रतिनिधी):- ज्या शाळेत आपले शिक्षण झाले, ज्या शाळेतील संस्कारांची शिकवण घेऊन आपण स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे आहोत. त्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये; म्हणून माजी विद्यार्थ्यांनी गणवेशासह शैक्षणिक साहित्याची मदत केली आणि दातृत्वाचा अनोखा वसा जपला. गेल्या तीन वर्षांपासून पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ हा उपक्रम नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यंदाही या उपक्रमाला समाजाच्या विविध क्षेत्रातील दानशूरांचा भरघोस प्रतिसाद लाभला. विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि वनस्पती विद्या मिशनचे संस्थापक सागर अहिरे, युवा उद्योजक आनंदा कांगणे यांनी गणवेश, ॲड.जयवंत गायधनी, वनिता चकणे (सानप) यांनी वह्या, भारतीय सैन्य दलातील चंद्रभान बोराडे यांनी कंपासपेटी आणि पेन, युवाकवी शरद आडके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी, प्रवीण गायधनी आदी माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केल्याने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करता आले. मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक आणि कर्मचारीवर्ग यांच्यासह विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.
