
सोनांबे (ता.सिन्नर) येथे पर्यावरणप्रेमाचा अनोखा उत्सव साजरा करत आई भवानी वृक्ष मित्र परिवार व वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या वतीने गावातील तब्बल चारशे वृक्षांचा पहिला वाढदिवस आणि 111 नव्या वृक्षांची लागवड मोठ्या जल्लोषात पार पडली. या सोहळ्याला वनप्रस्थ फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज देशमुख, आई भवानी वृक्ष मित्र परिवाराचे अध्यक्ष सोपान बोडके, विनोद रोकडे, सोपान पवार, ज्ञानेश्वर जोर्वे, सागर पवार, समाधान बोडके, भाऊसाहेब म्हसाळ, बाळासाहेब पवार, विजय पवार, अक्षय पवार, राम कडाळे व त्यांचे सहकारी वृक्ष मित्र तसेच सरपंच सौ. प्रमिला पवार, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. रविंद्र पवार, माजी सरपंच जनार्दन पवार, विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष तानाजी पवार, गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष शरद रत्नाकर, माजी प्राचार्य आर. डी. पवार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दामोदर बोडके, पोलीस पाटील चंद्रभान पवार, ग्रामपंचायत सदस्य भगवान पवार, ग्रामविकास अधिकारी संभाजी मार्कंडे, अनिल पवार, नंदु पवार, डॉ . शांताराम शिंदे, वसंत गोसावी, सुभाष पवार, मधुकर शिंदे,भजनी मंडळाचे बाळासाहेब पवार, शांताराम पवार, रविंद्र पवार, रंगनाथ पवार, शंकर पवार, केशव पवार, सुमन बोडके, मिना रोकडे, अनिता कडभाणे, सुजाता जगताप, पल्लवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. भजनी मंडळाच्या विणा, टाळ, मृदंगाच्या गजरात वृक्षांच्या पालखीची भैरवनाथ मंदिर ते काशाई मंदिर पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे”, “कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी” या भक्तीमय अभंगांनी वातावरण भारावून गेले, तर “झाडे लावा, झाडे जगवा”, “पाणी अडवा, पाणी जिरवा” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मागील वर्षी गावात 110 कडुनिंब, 60 पिंपळ, 50 वड, 50 शिसव, 25 अर्जुन सादडा, 12 ताम्हण अशा विविध 400 देशी प्रजातींची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षभर या वृक्षांची आई भवानी वृक्ष मित्र परिवार, वनप्रस्थ फाउंडेशन व देणगीदारांच्या सहकार्याने देखभाल करण्यात आली.

वाढदिवसाचा केक कापण्याऐवजी चिमुकल्यांच्या हस्ते फळांची टोपली उघडून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महिला भगिनींनी वृक्षांना राख्या बांधून निसर्गबंध दृढ केला. या कार्यातून प्रेरणा घेऊन भाऊसाहेब पवार यांनी 150 आणि युवा शेतकरी युवराज डगळे यांनी आपल्या शेतात 250 पेक्षा जास्त फळझाडांची लागवड केली असून, त्यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.आई भवानी वृक्ष मित्र परिवाराने गेल्या नऊ वर्षांत आई भवानी मंदिर परिसरात दहा हजारांहून अधिक झाडांची लागवड केली असून, त्यांची निगा राखून डोंगर परिसराला हिरवाईचे नवे सौंदर्य दिले आहे. वृक्ष लागवडी बरोबरच दररोज एक तास श्रमदान करून गाव स्वच्छतेचीही जबाबदारी त्यांनी हिरीरीने पार पाडली आहे. पर्यावरण, भक्ती आणि लोकसहभागाचा असा संगम सोनांबे गावाच्या हरित परंपरेला नवे बळ देत आहे.
