
सिन्नर (प्रतिनिधी ) दिवंगत. लोकशाहीर. भिमाजी महादेव भाटजीरे यांच्या 21व्या पुण्यस्मरणार्थ गवळीनाथ मंदिर पटांगण सिन्नर येथे पार पडलेल्या कलगी-तुरा या लोकगीत गायनाच्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील नामवंत शाहिरांनी सहभाग घेऊन आप-आपली उत्कृष्ट कवणे सादर केली. त्यात त्यांचे जेष्ठ चिरंजीव शाहीर रंगनाथ भिमाजी भाटजीरे तसेच उत्तम जाधव, सखाराम नन्हे आदींनी आपली कवणे सादर केली.

श्री भिमाजी भाटजीरे यांनी शाहिरी परंपरा जोपासण्यासाठी कुठल्याही आर्थिक अपेक्षा न करता ही परंपरा टिकून राहावी व वृद्धिंगत व्हावी याकरिता जीवन भर प्रयत्न केले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव शाहीर रंगनाथ भाटजीरे हे सुद्धा शाहिरी परंपरा जोपासण्याकरता अथक प्रयत्न करीत आहे. तसेच श्री भिमाजी भाटजीरे यांची तिसरी पिढी या क्षेत्रात काम करत असून त्यांचे नातू चिरंजीव अभिजीत शिवाजी भाटजीरे हे ही संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. तसेच भिमाजी भाटजिरे यांची नात पूनम भाटजीरे (पाटील) ही अमेरिकेत वास्तव्यास आहे.

लोकशाहीर भिमाजी भाटजीरे यांचे वडील दिवंगत महादू त्र्यंबक भाटजिरे स्वातंत्र्यपूर्व काळ १९३२- ३५ लोकल बोर्ड (नगर परिषद) मेंबर होते. वडिलोपार्जित स्थावर जंगम मालमत्ता सांभाळून पंजोबा, आजोबा, वडील, चुलते यांचा लोककलेचा वारसा अभिजित शिवाजी भाटजीरे याने शास्त्रीय संगीतात तीन पिढ्यांचा वारसा चौथ्या पिढीत वृद्धिंगत केला आहे त्यामुळे पंचक्रोशीत भिमाजी नाना भाटजीरे यांचा लोककलेचा आदर्श समाजामध्ये आदर्शवत आहे असे मत सेवानिवृत्त नायब तहसीलदार महामित्र दत्ता वायचळे यांनी व्यक्त केले दरवर्षी गेल्या ५५- ६० वर्षांपासून नागपंचमी या सणाच्या दिवशी शाहीर वरदी परशराम कलगीतुऱ्याचा कार्यक्रम व कवणे तालुक्यातील लोककलावंत दरवर्षी साजरा करतात. दरवर्षी श्री क्षेत्रपाल गवळीनाथ महाराज यांच्या प्रांगणात लोकशाहीर भिमाजी नाना भाटजीरे यांची ९ ऑगस्ट रोजी पुण्यस्मृतिदिनानिमित्त “लोककलेचा जागर” सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रम प्रसंगी लोकशाहीर. रंगनाथ भिमाजी भाटजीरे (वय ६१) हे मोठ्या तडापिणे वडिलांचे सहकारी कलावंत व तरुण कलावंत यांना या लोककलेमध्ये सातत्याने सहभागी करून लोककलेचा आनंद द्विगुणित करीत आहेत. सिन्नरकरांना ही लोककलेची मेजवानी मिळत असल्याने लोकांमध्ये भाटजीरे परिवाराबद्दल आत्मीयता कायम आहे.एकूणच ह्या परिवाराने कलेचा ध्यास घेतला असून ह्या कलेला लोकाश्रय मिळावा यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.
