
.नाळेगाव (प्रतिनिधी )९ ऑगस्ट हा आदिवासी गौरव दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो या निमित्ताने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनाचा कार्यक्रम शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नाळेगाव ता. दिंडोरी जि. नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभातफेरीने करण्यात आली , यावेळी परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. त्यानंतर मुख्य समारंभ हा शाळेतील बहुउद्देशीय सभागृहात पार पाडला.

यामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुदाम तमखाने यांनी केले. देशासाठी व समाजासाठी योगदान देणाऱ्या आदिवासी क्रांतीकारकांविषयी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमासाठी नाळेगावचे प्रथम नागरिक सरपंच श्री. संजय लहांगे, दिंडोरी पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.वसंत थेटे, सीटू संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री.रमेश चौधरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हरि कडाळी, उपाध्यक्ष सौ.सविता घोटे, माजी सरपंच हिराबाई गांगोडे तसेच गावातील व परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

श्री.वसंत थेटे यांनी आपले विचार मांडताना सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या व क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री.रमेश चौधरी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की विद्यार्थ्यांनी जसे आपले आज कलागुण दाखवले तसेच अभ्यासातील आपली प्रगती उंचावण्यासाठी प्रयत्न करावा ,त्यासाठी पालकांनी,शिक्षकांना साथ देणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यानंतर विरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण मेळाव्याचे नागपूर येथून ऑनलाइन प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सोनार सर यांनी केले.
