
“न्यायडोंगरी (प्रतिनिधी) आज ९ ऑगस्ट २०२५ रोजी स्व. गंगाधर (अण्णासाहेब) शिवराम आहेर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,न्यायडोंगरी येथे “जागतिक आदिवासी दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी न्यायडोंगरी ग्रामपालिकेच्या सरपंच सौ. सुशीलाबाई अहिरे या होत्या.

तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सरचिटणीस मा. अनिलदादा आहेर, तसेच रूपचंद अहिरे, ताराचंद मोरे, अशोक दळवी पालक प्रतिनिधी उदयसिंग वसावे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतीमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या भाषणांमधून आदिवासी समाजाचा इतिहास, परंपरा व संस्कृती यावर प्रकाशझोत टाकला.शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केलेले आदिवासी नृत्य, लोकगीते आणि पारंपरिक पोशाख प्रदर्शन यामुळे कार्यक्रमात रंगत आली . या निमित्ताने निसर्ग, शेती व आदिवासी लोककलेचे समाजातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आदिवासी समाजाचे योगदान आणि त्यांचे संवर्धन करण्याची गरज यावर भर दिला.

आदिवासी दिनानिमित्त संस्थेचे सरचिटणीस ॲड अनिल दादा आहेर यांच्याकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हॉलीबॉल व नेट , लेझीम इत्यादी खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
