
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर साऱ्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असल्याने निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड झालेला असतानाच निवडणूक आयोगाने राज्यातील पर्यायाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे स्पष्ट संकेत देत मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केल्याने गाव-पातळीवर इच्छुकांच्या अपेक्षांना घुमारे फुटले आहेत.

आगामी एप्रिल महिन्यात गाव कारभाऱ्यांच्या निवडणुका होऊ घातल्या असून लवकरच नवे गाव कारभारी त्या त्या ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेऊ शकतील. महाराष्ट्र राज्यातील 1 हजार 673 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुका होणार असून नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 202 ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक 65 तर निफाड व बागलाण तालुक्यात 30 ग्रामपंचायत आहेत. त्र्यंबकेश्वर 18, कळवण 14, मालेगाव 12, नांदगाव 8, येवला 8, नाशिक 7, दिंडोरी 4, देवळा 2, पेठ 1, चांदवड 1 याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील निवडणुका होणार आहेत. त्यासाठी इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्ष सरसावले असून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

ग्राम गाव पातळीवरील या निवडणुका असल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या अस्मितेच्या , प्रतिष्ठेच्या न केल्या तर नवलच ! अर्थात त्या त्या गावातील राजकीय वातावरण, स्थानिक परिस्थिती, हेवेदावे, गडतट, संबंध आणि निवडणुकीसाठी प्रसंगी अवलंबले जाणारे मिलीजुलीचे धोरण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपापल्या राजकीय पक्षांची पाळेमुळे रुजवून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, काँग्रेस आणि छोट्या-मोठ्या राजकीय पक्ष संघटनांकडून यासाठी रानही पेटविले जाईल यात शंका नाही. परंतु त्या त्या तालुक्यातील परिस्थिती विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी व सदस्य, राजकीय नेते मंडळी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विविध सहकारी सोसायट्या, आदींसह ते ते घटक या निवडणुकीत अधोरेखित होणार आहेत. आणि त्यावरून निवडणुकीची दिशा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गाव कारभाऱ्यांच्या या निवडणुका त्यांच्या पातळीवरच गावकऱ्यांच्या सहभागाने झाल्या तर ईष्ट ठरेल. ग्राम गाव पातळीच्या या निवडणुका असल्या तरी राजकीय वावटाळात त्या फिरणारच. त्यातही मोठ्या आणि महत्त्वाच्या ग्रामपंचायतीकडे साऱ्यांचे लक्ष राहणार असून त्या आपल्या अखत्यारित ठेवण्यासाठी राजकारण, प्रयत्न तर होणारच! ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या निवडणुका आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आता सारेच तयारीला लागले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने नाशिकसह महाराष्ट्र राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. नाशिक महापालिकेवर व नाशिक जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका वर प्रशासकीय राजवट असल्याने गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिका च्या अवघ्या कारभाराचे दायित्व आयुक्तांकडे एकवटले आहेत. कधी या निवडणुकांचे बिगुल वाजते असे इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्ष – संघटनांना झाले असले तरी पावसाळ्यापूर्वी निवडणुका होण्याचे मनसुबे धुळीला मिळाले आहे. कदाचित दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतरही निवडणुका होतीलच याची शक्यता नाही. त्यामुळे सध्या तरी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकीचे देव पाण्यातच आहे. त्यामुळे इच्छुक मंडळीचे तुर्त मनसुबे थंडावले आहेत.
