
नाशिक ( प्रतिनिधी): देशभरातील साखर उद्योगात वैविधांगी कार्य केले. या उद्योगातील जीवनानुभवांमुळे माझे यंत्रावरचे हात पेनावर स्थिरावले. साहित्यामुळे माझे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य साखरेप्रमाणे अधिक गोड झाले, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक वाळू आहेर यांनी मांडले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘अंतरीचे बोल’ या पुस्तकावर विचार मांडताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री सुनंदा पाटील होत्या. श्री.आहेर पुढे म्हणाले की, खाण्यात साखरेचे प्रमाण वाढले तर प्रकृती बिघडते. परंतु साहित्य हे जितके जास्त हाताळले तितकी आपली प्रवृत्ती आणि प्रकृतीही सुधारते. साखर कारखाना व्यवस्थापनात अभियंता म्हणून उत्तम कामं करता आली. त्यातून नंतरच्या काळात काव्यलेखनाला ऊर्जा मिळाली, असेही ते म्हणाले. त्यांनी काव्यसंग्रहातील काही निवडक कवितादेखील सादर केल्या. चारुदत्त आहिरे आणि संजय आहेर या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले तर समन्वयक संजय आहेर यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.११) ज्येष्ठ पत्रकार दीप्ती राऊत या आपल्या ‘कोरडी शेतं… ओले डोळे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
