
सिन्नर( प्रतिनिधी):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलीत डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव वामने,सरपंच रामनाथ पावसे,विद्या ठाकरे,सीमा गोसावी , वरिष्ठ लिपिक राणी शिंदे, रोहिणी भगत ,ललिता वारुंगसे,उषा वाजे,परवीन शेख आदी उपस्थित होते.उपस्थितांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित महिलांचा पेन,गुलाबपुष्प व लघुवस्त्र देऊन गौरव करण्यात आला . डुबेरे गावच्या सरपंचपदी रामनाथ पावसे यांची निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले म्हणाले की ,महिलांनी अनादी काळापासून सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व प्रगती केली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील महिलांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आज सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहे. महिलांचे रक्षण व संरक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. अशा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन उगले यांनी केले.

तनुजा निमसे,मानसी जाधव, दृष्टी ढोन्नर ,उर्मिला सदगीर या विद्यार्थ्यांसह उपशिक्षिका कल्पना शिंदे,जयश्री गोहाड यांनी महिला दिन का साजरा करतात ? कर्तृत्ववान महिलांचा इतिहास याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. इयत्ता ९ वी तु-अ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक सोमनाथ बोडके व पी.आर.करपे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन कुमारी अंकिता ढोली,मानसी हिरे,कोमल वाघ व श्रावणी पावसे यांनी तर आभार उपशिक्षक पी. आर.करपे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


