
मोखाडा (दिनेश आंबेकर , प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे वाणिज्य विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले.बदलत्या काळातील आर्थिक साक्षरता,स्टॉक मार्केट, गुंतवणूक,ऑनलाइन फसवणूक व वित्तीय क्षेत्रातील बदलते प्रवाह यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊन मार्गदर्शन व्हावे यासाठी दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या सुरवातीला उपप्राचार्य, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.एस.जी. मेंगाळ यांनी प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय करून दिला. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी) यांच्या वतीने स्मार्ट ट्रेनर प्रा.मक्सुद मेमन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आजच्या काळात वित्तीय क्षेत्राबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे अनेकांची फसवणूक होते त्यासाठी सर्वांनी आर्थिक साक्षर झाले पाहिजे.या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी बदलत्या काळातील आर्थिक साक्षरता,स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड,गुंतवणूक,सरकारी योजना,वित्तीय क्षेत्रातील कायदेशीर तरतुदी,ऑनलाइन फसवणूक व वित्तीय क्षेत्रातील बदलते प्रवाह अशा विविध घटकांवर बहुमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थितांनी भविष्यात वित्तीय क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन बचत व गुंतवणूक कशी करावी यावर सखोल चर्चा केली.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन.चांदोरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून आपले विचार यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.के.डामसे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम. आर. खंबाईत यांनी मानले.चर्चासत्र यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.सैंदनशिव, प्रा.शिद,प्रा.महाले,प्रा. बोबे यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने या राष्ट्रीय चर्चासत्रात ऑनलाईन सहभागी झाले होते.
