
भारतीय सैन्यासाठी अविरत कष्ट उपसणाऱ्या, आपल्या जीवाची पर्वा न करता स्वामिनिष्ठेने शत्रूराष्ट्राच्या गोळ्यांच्या वर्षावातही आपल्या पोस्टवर रिपोर्टिंग करणाऱ्या एका स्त्रीलिंगी खेचराची ही गोष्ट. तिच्या पराक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे अशा पेडोंगी या भारतीय सैन्यातील खेचराने दि. २५ मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच लोकांना माहित नाही की, सरहद्दीवर भारतीय सेनेचा एक मजबुत कणा “खेचर” असतात, ते सैन्यासाठी माल वाहतुक करतात.पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका स्त्रीलिंगी खेचराच आहे. सीमेवर, जिथे वाहतुकीची साधने म्हणजे रोड नसतात, रेल्वे लाईन नसते, तिथे सैन्याला दारुगोळा, उपजिवेकेची सर्व साधने, इंधन इत्यादी, वाहतुकीचे कामे खेचर करतात. “पेडोंगी” नावाचे खेचर कोणी साधंसुधे खेचर नाही, तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलं आहे. जेव्हा दळणवळणाची साधने सुकर नव्हती तेव्हा भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचर काम करत होते.भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्रसपाटीपासून उंच १७,००० फुटापर्यंत उंच शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीची रक्षा करत असतात. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट अश्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी कोणतच वाहन आजही जाऊ शकत नाही. तिकडे स्वतःचा जीव वाचवणं हीच मोठी कसरत असते, अशा भागात दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकत नाही.’पेडोंगी’ चं खरं सैनिकी तिचं नाव होतं. तिचं खरं नाव होतं Hoof तिचा स्टाफ नंबर १५३२८ होता. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्क प्रणाली आणि प्रगत अशी वाहन नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रतिकुल परिस्थितीला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमानइतबारे पार पाडलं. १९७१ साल उजाडलं. भारत- पाकीस्तान युद्ध सुरु झालं. भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकीस्तानी सैन्यांनी पकडलं आणि आपल्या पोस्टवर तिला बंदी बनवून तिच्यावर पाकीस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण सांगते प्राण्यांना भावना नसतात? भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकीस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटरचे अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटावर पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं ते ही शत्रूच्या प्रदेशात काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही.) भारतीय हद्दीत प्रवेश करून भारतीय पोस्ट वर आपली हजेरी नोंदवली.तिच्या प्रामाणिक आणि आपल्या देशासाठी असलेल्या प्रेमाला बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालयीन कमांडरने आपल्यावर असणाऱ्या ऑफिसरना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 AT Company ASC मध्ये काम करत होती. त्याकाळात २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती पण त्या वयातही आपल्या पाठीवर सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होती. युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांना पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूत) ताईत म्हणून केली. ह्या युनिटच्या १९८९-९० च्या ग्रिटींग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. ह्याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तरप्रदेशमध्ये झाली. इथल्या खूप मोठ्या परीसरात पेडोंगीने आपला उर्वरित काळ आरामात व्यतीत केला.१९९२ ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला नेण्यात आलं. तिथे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी, देशसेवेसाठी कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला ‘पेडोंगी’ हे नाव देण्यात आलं. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं होतं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता पण पेडोंगी ही पहिली खेचर होती जिला हा सन्मान देण्यात आला. ह्या नंतरचा काळ पेडोंगीने बरेलीलाच व्यतीत केला. १९९७ ला पेडोंगीच्या सेवेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर असं तिचं नाव सुवर्ण अक्षरांनी कायमच नोंदवलं गेलं. २५ मार्च १९९८ ला पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि भारतीय सेनेतील खेचरांच्या सेवेतील एका युगाचा अंत झाला. असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या संपूर्ण आयुष्यात तो तुम्हांला रस्ता दाखवेल. पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखत संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटावर भारतीय सरहद्दीची रक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून परत आली. पण मग एकटी तीच का परत आली? तिच्यासोबत इतर पकडलेली खेचर आली नाहीत, पण ती जिवावर उदार होऊन परत आली.पेडोंगीला आज जाऊन अनेक वर्षाचा कालावधी झाला पण आपलं जिवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे. तिचा भीमपराक्रम, देशभक्ती आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे. देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला आमचा कडक सॅल्यूट.
