
नांदगाव( प्रतिनिधी ) कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे इयत्ता 11वी व इयत्ता 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा ‘पालक- शिक्षक मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी आपल्या पाल्यांना संस्कारक्षम बनविण्यासाठी कौटुंबिक वातावरण आनंददायी ठेवण्याचे आवाहन केले. आपल्या पाल्यांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे विविध उदाहरणातून पटवून दिले. आपल्या पाल्यांना फास्टफूड पासून परावृत्त करून घरी बनवलेले रुचकर खाद्यपदार्थ खाण्याची सवय लावावी

जेणेकरून त्यांची प्रकृती उत्तम व प्रवृत्ती चांगली राहील असे प्रतिपादन केले तसेच संस्थेच्या व महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.सदर प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डी.एम.राठोड, विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा पी.एम. आहेर, कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.जी.व्ही. बोरसे, प्रा ए.के.जाधव प्रा एस.जी. पवार यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची NEET, JEE या परीक्षांची तयारी व्हावी यासाठी संस्था स्तरावरून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा इ.उपक्रमांची पालकांना माहिती दिली.

याप्रसंगी उपस्थित पालकांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात श्री. माधव कुमावत व विद्यार्थिनी कु. तनिष्का परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी पालक,विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सायली बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.बी.के.पवार यांनी केले.

