
नांदगाव ( प्रतिनिधी) व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव या शाळेत संविधान दिनानिमित्त एक आगळी वेगळी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शाळेचे उपमुख्याध्यापक डॉ. जोगेश्वर नांदुरकर, श्री. दाभाडे, श्रीमती सांगळे, श्रीमती शिंदे, श्री. कुणाल जोशी यांच्या सह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. डॉ. नांदुरकर सर यांच्या सूचनेनुसार भारत माता, भारतीय संविधान, डॉ. आंबेडकर यांच्या बरोबर कै. प्रेम बिहारी रायजादा आणि कै. राम नारायण यांचाही जयजयकार करण्यात आला.कै. प्रेम बिहारी यांनी अवघ्या तीन महिन्यात संपूर्ण घटना आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहून काढली होती.

विशेष म्हणजे या कामाचे कोणतेही मानधन त्यांनी घेतलं नव्हतं. त्यांनी फक्त एकच विनंती केली होती :”माझे आईवडील माझ्या बालपणीच गेले. त्यानंतर माझ्या आजी आजोबांनी माझा सांभाळ केला. म्हणून घटनेच्या शेवटच्या पानावर माझ्या आजोबांच्या नावाचा उल्लेख करावा “. ती विनंती मान्य करून घटनेच्या शेवटी त्यांच्या आजोबांचे नाव घालण्यात आले.कै. श्री. राम नारायण हे सुप्रसिद्ध चित्रकार कै. श्री. नंदलाल बोस यांचे शिष्य होते.

आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाने त्यांनी घटनेसाठी चित्रं काढली होती. विशेष म्हणजे या चित्रांच्या खाली सही करायला ते तयार नव्हते. शेवटी आपल्या गुरुच्या आग्रहाने त्यांना सही करावी लागली.आज विस्मृतीत गेलेल्या या माणसांचा जयजयकार करणारी भारतातील कदाचित एकमेव शाळा म्हणजे व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव.
