
सदानंद (शशीभाऊ)कदम यांच्या स्मृतिदिनी ‘बाप सोडून जाताना…’ कार्यक्रमाचे आयोजन
ओझर:- (प्रतिनिधी)
‘बापाच्याही काळजात/असे जिव्हाळ्याची गाय
प्यावा ज्ञानेश्वरी पान्हा/झाला ज्ञानदेव माय!’
आघाडीचे युवाकवी प्रशांत केंदळे यांच्या आशयसंपन्न कवितेसह कवी राजेंद्र उगले यांनी सादर केलेल्या आणि बापाचे कर्तृत्व सांगणाऱ्या विविध कवितांनी उपस्थित भावुक झाले.
निमित्त होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निफाड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद (शशीभाऊ) कचेश्वर कदम यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे! कदम परिवाराच्या वतीने येथील शिंदे लॉन्समध्ये कवी प्रशांत केंदळे, राजेंद्र उगले, रवींद्र मालुंजकर आणि प्रा.प्रीती गायकवाड-पाटील यांच्या ‘बाप सोडून जाताना…’ या अनोख्या काव्य-अभिवादनाचे आयोजन करण्यात आले होते.

माझ्या हिरव्या शेतात/तोच होता एक नदी
पीक गाभुडलं आज/बाप नाही जगामधी!’
वडिलांच्या निघून जाण्याने आपल्या आयुष्यामधली हिरवीगार समृद्धी नष्ट झाल्याची भावना कवी राजेंद्र उगले यांनी व्यक्त केली. कवी उगले यांनी येऊ दे मित्रा डोळ्यात पाणी (कमलाकर देसले), बाप बाहूचा आधार, बाप चांदरात दिवा, नाही गेलो पंढरीला या कविता सादर करत वडिलांबद्दलच्या भावनांना उजाळा दिला. तर प्रशांत केंदळे यांनी बाप-लेकीची कहाणी, शेतामधी माझी खोप(इंद्रजीत भालेराव), बाप (लता ऐवळे), बाप स्वाभिमानी बाणा (अनिल दीक्षित), बाप माझा (गौरवकुमार आठवले) अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करत मैफिल भावनाविवश केली. युवा कवयित्री प्रा.प्रीती गायकवाड-पाटील यांनीही ‘बाप’ ही कविता सादर केली. कवी रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.
माजी आमदार मंदाकिनी कदम, अनिल कदम, मविप्रचे माजी सभापती माणिकराव बोरस्ते, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, एचएएल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, ओझर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे सचिव नामदेव गुरुळे, श्यामराव कदम, जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाचे सूर्यभान ठाकरे, दिनकर वाकचौरे, माणिकराव थोरात, भीमराव मंडलिक, देवराम गाडे, पंचक्रोशीतील विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह कदम परिवाराचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती कमल कदम, शंकर कदम, बाळासाहेब कदम, किशोर कदम, चंद्रकला सोनवणे, नलिनी वाळुंज, रवींद्र कदम, जयवंत कदम, विरेंद्र कदम, नरेंद्र कदम यांनी संयोजन केले.
