
जेष्ठ कवी रघुनाथ सावे
नाशिक दि. २३- (वार्ताहर)- नाशिकचे ज्येष्ठ कवी रघुनाथ सावे तथा आरके सावेतात्या यांना नाशिक कवीच्यावतीने सुरू करण्यात आलेला पहिला ‘नाशिक काव्यगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कवींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या नाशिक कवीच्या वर्धापनदिना निमित्त यावर्षी पासून सूरू करण्यात आलेला हा पुरस्कार संस्थेच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रु. २१००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आर के सावे हे ज्येष्ठ उद्योजक असून त्यांचे इप्सित, अनुकंपा, निर्झर, सायोनारा हे कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. जवळपास दहा वर्षे नाशिक कवीचे उपाध्यक्ष होते. वयाच्या ९३व्या वर्षीही त्यांचे लिखाण आणि वाचन सुरु आहे हे विशेष.
ज्येष्ठ कवी गझलकार आणि मसाप पिंपरी चिंचवड, पुणेचे अध्यक्ष राजन लाखे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाशिक कवीचे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. नोव्हेंबर २००३ मध्ये ज्येष्ठ लेखक आणि कवी शरद पुराणिक यांनी स्थापन केलेल्या नाशिक कवी या संस्थेचा बाविसावा वर्धापनदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा गुरूवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता भावबंधन मंगल कार्यालय, हनुमानवाडी, पंचवटी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्याच्या प्रारंभी उपस्थित कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. नाशिक कवीचे सर्व सदस्य आणि कवी आणि काव्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष सुभाष सबनीस, उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे, स्मिता बनकर, अलका कुलकर्णी, भारती देव, प्रांजली आफळे,अजय बिरारी, किरण मेतकर, सुरेश चौरे, राजेश जाधव यांनी केले आहे.
