
नाशिक:बी डी भालेकर शाळा वाचवा समिती नाशिकच्या धरणे आंदोलनाचा आज १६ वा दिवस होता. आंदोलनस्थळी शिवसेना (शिंदे गट) नाशिक जिल्हा प्रमुख व माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांनी भेट देऊन आंदोलनाची भूमिका जाणून घेतली. त्यांनी तत्काळ राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
स्पीकरवरून आंदोलकांशी संवाद साधताना भुसे यांनी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय रद्द झाल्याची अधिकृत माहिती दिली व “बी डी भालेकर शाळा पुन्हा त्याच ठिकाणी अद्यावत स्वरूपात सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे” असे स्पष्ट आश्वासन दिले.
भुसे यांनी सांगितले की, नगरविकास विभागाकडून शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नाशिकसाठी कुंभमेळा निधी मिळणार असून, त्यातूनही शाळेसाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच समितीची बैठक लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करून देण्याचेही त्यांनी मान्य केले.
अजय बोरस्ते यांनी सांगितले की, नाशिक भेटीदरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही बी डी भालेकर शाळेसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. परिसरात सर्वसामान्य व गरजू कुटुंबे राहतात; त्यांच्या मुलांचे शिक्षण अबाधित राहण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
यापुढे मनपा, नगरविकास विभाग आणि शिक्षण विभागाकडून सर्व पाठपुरावा करण्याचे आश्वासन बोरस्ते यांनी समितीला दिले. तसेच आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
समितीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, दिलेल्या शब्दाप्रमाणे तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा आहे. समितीच्या आंदोलनामुळेच विश्रामगृहाचा प्रस्ताव रद्द झाला असून हा आंदोलनाचा विजय आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आता शाळा जागेवरच पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी समिती पाठपुरावा करणार आहे.
नाशिककर, माजी विद्यार्थी, परिसरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाशिकची अस्मिता असलेली बी डी भालेकर मराठी शाळा वाचवण्यात यश आल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.
समितीच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले असून, उपस्थितांमध्ये कॉ. राजू देसले, दीपक डोके, तल्हा शेख, मनोहर पगारे, डॉ. ठकसेन गोराणे, गजू घोडके, ॲड. प्रभाकर वायचळे, पद्माकर इंगळे, योगेश कापसे,अमर गांगुर्डे, गौतम पवार,आबा डोके, प्रवीण पगारे, संजय चौरिया, विजू तेजाळे, दत्तात्रया कोठावदे आदींचा सहभाग होता.
