
सिन्नर (प्रतिनिधी ) सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी प्रभाग 5 अ मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले उमेदवार उदय प्रभाकर गोळेसर यांनी आपले नामनिर्देशन आज दाखल केले आहे. उदय गोळेसर आज नामनिर्देशन दाखल करतील अशी माहिती मिळताच प्रभागातील तरुण, महिलावर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिक शेकडोंच्या संख्येने त्यांच्यासोबत नामनिर्देशन दाखल करण्यास नगरपालिकेपर्यंत पोहोचले.
प्रभाग 5 अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित आहे. क्रांती चौक, लोंढे गल्ली, काजीपुरा, बुरुड गल्ली, सुतार गल्ली, वावी वेस, तानाजी चौक या परिसरातील मोठ्या भागाचा समावेश प्रभाग 5 मध्ये बघायला मिळतो. तब्बल 5,483 म्हणजेच सिन्नर मधील एकूण मतदार संख्येच्या 10 टक्के मतदार संख्या या एकट्या प्रभागात आहे. सिन्नरचा सर्वात मोठा प्रभाग अशी ओळख असलेला हा प्रभाग 5,000 च्या वर मतदार असलेला सुद्धा एकमेव प्रभाग आहे. असे असतांनाही उदय प्रभाकर गोळेसर वगळता अन्य एकही इच्छुक पुरुष चेहरा अद्याप समोर आलेला नाही हे विशेष. उदय प्रभाकर गोळेसर हे व्यावसायिक असून उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या परिवाराला राजकीय पदभारांचा वारसा आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रणाली गोळेसर या सिन्नर मधून एकमेव अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवार होत्या. पाणी आरोग्य आणि सामाजिक कार्य यामध्ये आपली ओळख निर्माण करणारे उदय प्रभाकर गोळेसर यांनी शेकडोंच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीच चार ठिकाणी चौका चौकात झालेल्या बैठकांमध्ये त्यांना विविध मंडळे आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. या प्रभागाचा अंदाज घेतल्यास उमेदवार मिळवण्यासाठी उर्वरित दोन गटांना चांगलीच चाचपनी आणि पडताळणी करावी लागत असल्याची माहिती मिळते आहे. तूर्तास कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण उदय प्रभाकर गोळेसर हे खासदार राजाभाऊ वाजे यांचे खंदे समर्थक समजले जातात. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या पत्नी आणि त्यांनी राजाभाऊ वाजे यांची कायमच पाठराखण केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून उदय गोळे सर यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
