नाशिक:-(प्रतिनिधी )जीवनाला दिशा देणारे साहित्य आजच्या काळात महत्त्वपूर्ण आहे. त्यातूनच सुंदर जगण्याची शिदोरी प्राप्त होते, असे प्रतिपादन प्राचार्या मानसी देशमुख यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात १०८वे पुष्प 'सृजन-संवाद' या पुस्तकावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अर्जुन वेलजाळी होते. प्राचार्या देशमुख पुढे म्हणाल्या की, दैनंदिन जीवनाकडे गांभीर्याने विचार करायला लावणारी कथा साकारताना या कथासंग्रहामध्ये विविध पत्रांची व्यक्तिमत्त्वं, समस्येची तीव्रता आणि तर्कसंगत उपाय याची वीण अल्प शब्दात विणल्यामुळे वाचकांना या कथा बांधून ठेवतात. उपदेशाचे ओझे वाचकावर कुठेही लादले नाही तर या कथा सहजपणे साकारल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे, वाळू आहेर या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुनंदा पाटील यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१४) प्रा.केशव मोरे 'गानमेवा' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.