
नाशिक:-( प्रतिनिधी )पळसे येथील ग्रामाभिमान मंच या सेवाभावी संस्थेच्या वतीने मंगळवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक वाचनालय, पळसे येथे दुपारी ३ वाजता जिल्हास्तरीय स्वलिखित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, संविधान, सेवा, साहित्य, संस्कृती या पंचसूत्रीच्या आधारे पळसे पंचक्रोशीत कार्यरत असलेल्या ग्रामाभिमान मंचच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त या काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांसाठी खुला प्रवेश असलेल्या आणि प्रवेशशुल्क नसलेल्या या स्पर्धेत जातीत जास्त कवींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंचचे अध्यक्ष प्रमोद गायधनी यांनी केले आहे. तालुका संघाचे चेअरमन शरद गायखे पुरस्कृत प्रथम पारितोषिक रु.२१००/-, उत्कर्ष क्लासेस पुरस्कृत द्वितीय पारितोषिक रु.१७००/-, राहुल फडोळ पुरस्कृत तृतीय पारितोषिक रु.११००/- आणि आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास (बंटी) भागवत, कामगार नेते प्रशांत कापसे, विचारक्रांती वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, मंगला गायकर, भास्कर चौधरी, कवी रवींद्र मालुंजकर पुरस्कृत सहा उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना सामाजिक कार्यकर्ते दिवंगत सोमनाथ आगळे यांचे स्मरणार्थ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार असल्याचे मंचचे सचिव सुनील आगळे यांनी सांगितले. स्पर्धकांनी नोंदणी आणि अधिक माहितीसाठी मुख्य समन्वयक समाधान गायधनी (८४११८१६१६२) यांच्याशी संपर्क करावा. कवींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामाभिमान मंचाने केले आहे.
