
नाशिक, (प्रतिनिधी ): ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा गुरुवर्य सावळीराम तिदमे यांनी कवी रवींद्र मालुंजकर यांच्या साहित्यसाधनेचा गौरव करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ज्ञान, प्रबोधन, बोध आणि सूत्रसंचालन या चार स्तंभांचे योगपीठ असे संबोधले आहे. कवी रवींद्र मालुंजकर यांच्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या गाजलेल्या काव्यसंग्रहावरील ४५ मान्यवरांच्या प्रतिक्रिया संकलित असलेल्या ‘अक्षरमोती पेरताना…’ या विवेक उगलमुगले संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. १४ जून २०२६) सायंकाळी ६ वाजता औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
वैशाली प्रकाशन, पुणे आणि नाशिकच्या साहित्यविश्वाच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकात ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहावर साहित्यिक, समीक्षक, शिक्षक, कवी आणि रसिकांनी व्यक्त केलेल्या निवडक ४५ प्रतिक्रिया समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुस्तकाला अरविंद शेलार यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणि सचिन पगारे यांची कलात्मक सजावट लाभली आहे.
कवी रवींद्र मालुंजकर हे साहित्य, शिक्षण, सूत्रसंचालन आणि प्रबोधन या क्षेत्रांतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विविध साहित्यिक कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन, शब्दांवरील प्रभुत्व, साहित्यकृतींचे परीक्षण आणि समाजप्रबोधनातील योगदान यामुळे त्यांनी राज्यभर मोठा मित्रपरिवार आणि साहित्यिक स्नेहसंबंध निर्माण केले आहेत.
‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रभरातील साहित्यिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, तु. सी. ढिकले, जनार्दन देवरे, ज्ञानेश उगले, राजेंद्र आढाव, डॉ. प्रतिभा जाधव, डॉ. सुरेश सावंत, प्रा. बी. एन. चौधरी, विवेक उगलमुगले यांच्यासह अनेक मान्यवरांनी संग्रहाचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला आहे.
गिरणा गौरव प्रतिष्ठान व वैशाली प्रकाशन परिवाराने साहित्यप्रेमी, रसिक व जिज्ञासू वाचकांना या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमस्थळी ‘आठवांचे लक्ष मोती’ तसेच ‘अक्षरमोती पेरताना…’ ही दोन्ही पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार आहेत.
