
( मंगेश पाटील तळोदा)
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. येत्या १५ जून २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम आणि निसर्गरम्य तोरणमाळ येथील ‘नेताजी सुभाष चंद्र बोस आवासीय विद्यालयातील’ प्रवेशोत्सव कार्यक्रम राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत करणे आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तोरणमाळसारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात शिक्षणमंत्र्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या चिमुकल्यांचे आणि नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेचा परिसर फुलांनी आणि सजावटीने सजला असून, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या दौऱ्यादरम्यान शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून, शाळेतील शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तेचा आढावा घेणार आहेत. तसेच, शिक्षकांना अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत.
स्थानिक प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन समितीने या कार्यक्रमासाठी कंबर कसली असून, शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला एक नवी दिशा आणि बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे तोरणमाळ परिसरातील शैक्षणिक वातावरणात नवा उत्साह संचारला आहे.
