
चिखली ( प्रतिनिधी ): माननीय अनिस भाई यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत अभियान नोंदणी महाशिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास चिखली नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय पंडित दादा देशमुख तसेच आरोग्य सभापती आदरणीय विष्णू जोगदंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिरामध्ये प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अनेक लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नोंदणी करून आरोग्य सुरक्षा कवचाचा लाभ घेतला. या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी नगर प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी आयुष्यमान भारत योजनेचे महत्त्व विषद केले. हे कार्ड सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून भविष्यात गरजू कुटुंबांना मोठा आधार ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे यांनीदेखील नागरिकांशी संवाद साधत योजनेच्या विविध बाबींची माहिती दिली. आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचावे यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
या महाशिबिरामुळे अनेक नागरिकांना आरोग्य विमा संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली असून नागरिकांनी आयोजकांचे व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
